- तिघांच्या मुसक्या आवळून पिस्टल व काडतुसे केली जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील दिघी, आकुर्डी, देहूरोड परिसरात सापळा रचून तब्बल ९८ हजार २०० रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. मौलाली रहीम शेख (वय २०, रा. जुनी सांगवी. मूळ रा. कर्नाटक) याला पवारनगर, जुनी सांगवीत अटक करून सांगवी पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे ताब्यात घेतली. पोलीस नाईक शशिकांत देवकांत यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा ४१ हजारांचा मुद्देमाल दिघी पोलिसांनी बोपखेल फाटा चौक येथे कारवाईत जप्त केला. बबलू उर्फ यश मारुती दिसले (वय २०, रा. गणेशनगर, बोपखेल) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस नाईक हेमंत आव्हाड यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
देहूरोड येथील शितळानगर परिसरात आकाश शामराव गोरे (वय २६, रा. पांढरकर चाळ, आकुर्डी) याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा २५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस पथकाने जप्त केला. पोलीस नाईक गणेश मालुसरे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.