- अग्निशामक दलाच्या १७ जवानांना बाधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- क्लोरिन वायूची सिलेंडरमधून गळती झाली. ही गळती बंद करीत असताना अग्निशामक दलाच्या १७ जवानांना बाधा झाली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. भोसरी एमआयडीसीत बुधवारी (दि. ८) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
भोसरी एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक २१२, सेक्टर क्रमांक १०, गवळी माथा येथील सत्यसाई एन्टरप्रायजेस या कंपनीमध्ये क्लोरिन वायूची गळती झाल्याची माहिती बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली होती.
त्यानुसार अग्निशामक दलाच्या पिंपरी मुख्यालय आणि भोसरी अग्निशामक उपकेंद्रातील एक, असे दोन बंब तसेच एमआयडीसीच्या अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. कंपनीत जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारा क्लोरीन वायूचे काही सिलेंडर होते. त्यातील एक सिलेंडरमधून गळती होत होती. त्यामुळे अग्निशामक दलाच्या १७ जवानांना खाज तसेच खोकल्याचा त्रास जाणवण्यास सुरवात झाली. अडीच तासानंतर गळती थांबविण्यात यश आले.