- घरच्या घरीच मूर्ती विसर्जनाची शासनाची सूचना..
- श्रींच्या प्राणप्रतिष्ठापणेच्या मुहूर्तासाठी वाचा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता गणेशोत्सव अनावश्यक जल्लोष, गर्दीला लगाम घालत मर्यादित स्वरुपातच साजरा करावा लागणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना गृह विभागाने बुधवारी जारी केल्या. सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दर्शन भाविकांना मंडपात जावून करता येणार नाही वा मुखदर्शनही घेता येणार नाही. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत, असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
मंडपातील गणरायाचे लाईव्ह प्रक्षेपण करता येईल. त्यामुळे यंदा नामांकित, नवसाच्या गणरायाचे प्रत्यक्ष दर्शन घेणे भाविकांना अशक्य होणार आहे. दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे, असे गृह विभागाने म्हटले आहे. मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. सर्व मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद असून केवळ पूजा करण्यापुरतीच मोजक्या लोकांना परवानगी देण्यात आली आहे.
सरकारच्या सूचना….
मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. घरी शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रीम विसर्जनस्थळी विसर्जन करावे. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत – कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढू नये, असेही गृह विभागाने म्हटले आहे. सार्वजनिक मंडळाच्या गणपतीची उची कमाल ४ फूट तर घरातील गणपतीची उंची कमाल २ फूट असेल.
श्रींची प्राणप्रतिष्ठा मध्यान्हकालीच योग्य…
गणेशमूर्तीची स्थापना ही मध्यान्हकाली करावयाची आहे, असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी १२.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाल आहे. या वेळेत श्रीगणेशमूर्तीची स्थापना करावी. या वेळेत शक्य होणार नसेल तर पहाटे ५.३० पासून दुपारी १.४८ पर्यंत श्रीगणेशमूर्ती स्थापना व पूजा करावी.