- प्रकल्प कासवगतीने; जवाब विचारण्याचे सोडून पालिकेची ठेकेदारावर मेहेरबानी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२१) :- पालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प राबविले जात आहेत. त्या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू असून, अद्याप लाभार्थ्यांना सदनिका उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रकल्पाचे सल्लागार असलेल्या क्रिसील रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लिमिटेड या एजन्सीवर कारवाई करणे सोडून त्यांना पुन्हा मुदतवाढीचे बक्षीस प्रशासन व स्थायी समितीकडून देण्यात आले आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली, रावेत व बो-हाडेवाडी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. चऱ्होलीमध्ये १ हजार ४४२ सदनिका, रावेतमध्ये ९३४ व बो-हाडेवाडीत १ हजार २८८ अशा एकूण ३ हजार ६६४ सदनिका आहेत. पालिकेच्यावतीने या सदनिकांसाठी सोडत ही काढण्यात आली आहे. मात्र अद्याप इमारतींचे काम पूर्ण न झाल्याने लाभार्थ्यांना सदनिका दिल्या गेल्या नाहीत. तसेच, रावेत येथील जागेवरून न्यायालयात दावा दाखल आहे. नागरिकांना वेळेत घरे उपलब्ध करून देण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.
प्रकल्पच्या यशस्वीतेसाठी क्रिसील रिस्क अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही सल्लागार एजन्सी आहे. प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासन यांच्याकडून अनुदान प्राप्त करून घेणे, उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करणे, योजनेशी निगडीत पत्रव्यवहार करणे आदी कामेकरून घेण्यात येत आहेत. एजन्सीला सल्लागार म्हणून २ वर्षांसाठी काम देण्यात आले. त्यानंतर दोनदा मुतदवाढ देऊनही प्रकल्पाचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे, असे असताना प्रशासनाच्या वतीने पुन्हा जून महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये फक्त त्याच एजन्सीने भाग घेतला. त्यामुळे त्यांनाच पुन्हा काम देण्यात आले.