- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे केंद्रीय स्तरावर प्रयत्न..
- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- बोपखेलवासीयांसाठी बांधण्यात येत असलेल्या पुलाचे संरक्षण विभागाच्या जागेवरील रखडलेले काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठीची संरक्षण विभागाची आवश्यक असलेली अंतिम वर्किंग परवानगी मिळाली आहे. देशाचे नेते, माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या प्रयत्नामुळे परवानगी मिळाली आहे. संरक्षण विभागाचे सचिव आर.एस.यादव यांनी ही परवानगी दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले. शहरवासीयांसाठी पवारसाहेब सातत्याने मदत करतात. एवढे दिवस रखडलेली परवानगी त्यांनी मिळवून दिली.
नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असून आता संरक्षण विभागातील थांबलेले पुलाचे कामही मार्गी लागेल. काम लवकरच पूर्ण होऊन बोपखेलवासीयांसाठी पूल वाहतुकीस उपलब्ध होईल, असेही लांडे म्हणाले.
बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी बंद करण्यात आला. बोपखेल गावासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत मुळा नदीवरील पुल ते खडकीतून जाणारा एलफिस्टन रस्ता ते टँक रस्ता पक्क्या स्वरूपात करण्याच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्यात आले. २४ जून २०१६ रोजी महापालिकेमार्फत संरक्षण मालमत्ता अधिकारी यांच्याकडे बोपखेल वासियांसाठी मुळा नदीवर पुल व पक्का रस्ता बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाने काही अटींवर १६ हजार १२२ चौरस मीटर संरक्षण खात्याची जागा मुळा नदीवरील पुलासाठी महापालिकेकडे हस्तांतर करण्याची तयारी दाखविली.
हस्तांतरीत जमिनीच्या किमती इतकीच जमीन संरक्षण विभागाला महापालिकेने दिली पाहिजे, या प्रमुख अटीसह बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पुल बांधण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली. बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलासाठी संरक्षण विभागाच्या ताब्यातील १६ हजार १२२ चौरस मीटर जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून संरक्षण विभागाच्या ताब्यातील राज्य सरकारच्या येरवडा येथील ४ हेक्टर २२ गुंठे भुखंडापैकी २५ कोटी ८१ लाख रूपये इतक्या सममुल्याची ७ हजार ३६७.३ चौरस मीटर इतकी जागा प्रदान करण्यात आली. राज्य सरकारला या जागेचे मुल्य २५ कोटी ८१ लाख रूपये दिले आहेत.
महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणा-या पुलाचे ४ जानेवारी २०१९ मध्ये काम सुरू झाले. महापालिकेने वेगात काम सुरू केले. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, संरक्षण विभागाच्या जागेवरील काम बाकी होते. ते काम चालू करण्यासाठी संरक्षण विभागाची वर्किंग परवानगी आवश्यक होती. या परवानगीमुळे काम थांबले होते. ती परवानगी मिळविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले. अखेर संरक्षण विभागाची वर्किंग परवानगी मिळाली. त्यामुळे संरक्षण विभागाच्या जागेवरील पुलाचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विलास लांडे म्हणाले, बोपखेलवासीयांसाठी पूल लवकर होणे गरजेचे आहे. त्यासाठीची संरक्षण विभागाची वर्किंग परवानगी मिळण्यासाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि मी देशाचे नेते, माजी संरक्षण मंत्री शरद पवार साहेब यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. परवानगी मिळवून देण्याची विनंती केली. पवार साहेब संरक्षण मंत्री, सचिवांना भेटले. त्यांनी बोपखेल पुलाला तत्काळ अंतिम परवानगी देण्याची विनंती केली. साहेबांच्या विनंतीनुसार पुलाच्या कामाला परवानगी मिळाली आहे. परवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या झालेल्या बैठकीत दोन दिवसांत पुलाला परवानगी मिळेल असे पवार साहेबांनी आम्हाला सांगितले होते. त्यानुसार काल अंतिम परवानगी मिळाली. त्यामुळे कामाचा मार्ग मोकळा झाला असून आता तत्काळ काम पूर्ण करून बोपखेलवासीयांना वाहतुकीसाठी पूल उपलब्ध होईल. तसेच डेअरी फार्मचे कामही मार्गी लावू अशी ग्वाही साहेबांनी दिली आहे. महापालिकेला केंद्र, राज्य सरकारबाबत येणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी पवारसाहेबांनी मदत केली. एवढे मोठे काम पवारसाहेबांनी केले. महापालिकेतील सत्ताधारी भ्रष्टाचारात दंग आहेत. त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काही घेणेदेणे नाही. त्यांनी महापालिका विकायला काढली, अशी लोकांच्या मनात भावना निर्माण झाली आहे.