- ना ढोल ना ताशे; कोरोनाच्या कचाट्यातच यंदाचा गणेशोत्सव होतोय साजरा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर २०२१) :- गुलालाची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि मोरया… मोरयाच्या गजरात आज शुक्रवारी (१० सप्टेंबर) पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत उत्साही वातावरणात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कारखान्यात, घरोघरी, आणि सार्वजनिक मंडळांकडून श्रींची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहत परंतु कोरोनाचे नियम पाळून केली.
पिंपरी चिंचवड शहरातील यंदाचा गणेशोत्सव कोरोना-१९ विषाणू प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शांततामय व उत्साही वातावरणात पार पडण्यासाठी महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी आवाहन केले होते. कोरोना-१९ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेवून नागरिकांनीच बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी निरुत्साह जाणवला. नागरिकांनी सावधपणेच लाडक्या बाप्पाचे स्वागत केले.
बाजारपेठांमधून मूषकावर बसलेले, गरूडावर आरूढ झालेले किंवा सिंहासनावर विराजमान झालेले, तसेच कृष्ण, महादेवाच्या, हनुमान, शिवाजी महाराज, जेजुरीचा खंडोबा यांच्या रूपातील बाप्पा दिसत होते. घरोघरी आपापल्या पसंतीनुसार विविध आकाराच्या बाप्पांना वाजत गाजत आणले गेले. दुर्वा, फुले, धूप, दीप, पंचारती अशी साग्रसंगीत तयारी पूजेसाठी करण्यात आली होती.
घरगुती गणरायांच्या प्राणप्रतिष्ठापणेसाठी सकाळी साडेसहा ते दुपारी दीड पर्यंतचा मुहूर्त होता. शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजाअर्चा करून गणरायाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लाडक्या बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक करण्यामध्ये घरातील महिलामंडळ व्यग्र झाले होते. काही महिलांनी दुकानांमधून मोदक विकत घेण्यास पसंती दिली.