- पहिल्या टप्प्यात शहरातील ५ भागांत दररोज पाणी दिले जाणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात टप्प्याटप्प्याने २४ बाय ७ प्रमाणे म्हणजे दिवसभर पाणीपुरवठा केला जाणार आहे. सध्या निगडी प्राधिकरण भागात त्याप्रमाणे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
शहराची तहान भागविणारे पवना धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा बंद करून दररोज पाणी देणार का? २४ बाय ७ योजनेचे काय झाले, या संदर्भात विचारणा केल्यानंतर ते बोलत होते.
आयुक्त पाटील म्हणाले की, शहरातील २४ बाय ७ योजनेअंतर्गत नव्या जलवाहिन्या टाकण्याचे व नळजोडणीचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. प्राधिकरण, निगडी परिसरात गेल्या ३ महिन्यांपासून २४ बाय ७ अंतर्गत दिवसभर पाणीपुरवठा केला जात आहे. सुरुवातीच्या महिन्यात पाण्याचा वापर अधिक होता. तो आता कमी झाला आहे. टप्प्याटप्प्याने शहरात २४ बाय ७ योजना राबविली जाणार आहे. प्रथम शहरातील ५ भागांत दररोज पाणी दिले जाणार आहे. त्या दृष्टीने पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. त्यास महिन्याभरात सुरुवात केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.