- बॉण्ड कमिटीची आयुक्तांकडून स्थापना; अडीच हजार कोटींचा खर्च अपेक्षित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ११ सप्टेंबर २०२१) :- महापालिकेच्या वतीने पवना इंद्रायणी नदी सुधार योजना राबविण्यासाठी कर्जरोखे (बॉण्ड) उभारले जाणार आहेत. त्यासाठी आयुक्तासह अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या संदर्भातील सर्व निर्णय ही समिती घेणार आहे. प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी (दि .८) मंजुरी देऊन सर्वसाधारण सभेकडे शिफारस केली आहे.
पवना नदीच्या २४.३४ किलोमीटर आणि इंद्रायणी नदीच्या २०.८५ किलोमीटर अंतरासाठीही योजना राबविली जात असून, त्यासाठी सुमारे २ हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २०० कोटींचे कर्जरोखे काढले जाणार आहेत. कर्जरोखे उभारण्यासाठी काही संस्थांची नेमणूक केली आहे.
ऑफर दस्तऐवज, उपक्रम करार बॉण्ड्स इश्यू कमिटीची स्थापना यासह कोणत्याही बाबींचा निर्णय घेण्याबाबत व महापालिका बॉण्ड्स जारी करण्यासाठी संबंधित कोणतेही काम हाती घेण्यासाठी बॉण्ड कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यात आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, प्रकल्प संबंधित विभागाचे विभागप्रमुख व मुख्य लेखा परिक्षक यांचा समावेश आहे. कमिटीमार्फत कर्जरोखे संदर्भातील सर्व कामकाज निर्णय घेतले जाणार आहे.













