- चिखली पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२१) :- ‘तू गॅसचा बेकायदेशीर धंदा करतो. तुझी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी समाजात बदनामी करू. तुला प्रकरण मिटवायचे असेल तर एक लाख रुपये रक्कम आम्हाला दे. पैसे दिले नाही तर आमची संघटना चळवळीचे काम करते. आम्ही तुझ्यावर “अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू. तुला भाड्याचे दुकान चालवून देणार नाही’ अशी आरोपींनी फिर्यादीला धमकी दिली.
आरोपींनी फिर्यादीच्या दुकानात येऊन तसेच फोनवर पैशांची मागणी केली. फिर्यादीच्या दुकानातून २० हजार रुपये, अंकुश चौक ओटास्कीम निगडी येथून २० हजार रुपये असे एकूण ४० हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा २० हजार रुपयांची मागणी करत पैसे दिले नाही तर ठार मारतो अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार १ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान चिखलीतील साने चौक आणि निगडीतील ओटास्कीम येथे घडला. अजय राजेंद्र जैन (वय ३१, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष रामा चव्हाण, अक्षय रामा चव्हाण (वय २६, दोघे रा. चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, चिंचवड), सचिन गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.












