- कोविडबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून अट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२१) :- कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी शासनाने पर्यटनस्थळे, ऐतिहासिक किल्ले, लेण्या यावर बंदी घालण्यात आली होती. परंतु कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शासनाने नियमावली तयार करून पर्यटकांसाठी ऐतिहासिक किल्ले, लेणी यावरील बंदी हटवून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी दरवाजे उघडण्याचे आदेश दिले.
लोहगड किल्ल्याचा दरवाजा जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले यांच्या हस्ते लोहगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे पूजन करुन प्रवेशद्वार पर्यटकांसाठी उघडण्यात आले आहे. यापूर्वी धानिवले यांनी पुणे पुरातत्व विभागाकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी केली होती.
या ठिकाणी मानक कार्यप्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक असणार आहे. आवश्यक शारीरिक अंतर बाळगणे, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ करणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग निमंत्रण कायदा १८९७ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे. त्यानुसार लोहगड किल्ल्याचा दरवाजा उघडण्यात आला आहे.
















