- पुराव्यानिशी तक्रार प्राप्त झाल्यास दोषी ठेकेदारांवर कारवाई – पालिका आयुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२१) :- एफडीआर व बँक गॅरेंटीचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी पिंपरी – चिंचवड महापालिकेने संबंधित ठेकेदारांवर फौजदारी कारवाई केली आहे. तसेच स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदारांवरही कारवाई केली आहे. पुराव्यानिशी तक्रार प्राप्त झाल्यास दोषी ठेकेदारांना अभय दिले जाणार नाही, असे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले.
एफडीआर व बँक गरॅटीचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दबाव वाढल्याने तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फौजदारी कारवाई केली होती. त्यापैकी १८ ठेकेदार दोषी आढळले होते; मात्र, काही मोजक्याच ठेकेदारांवर कारवाई झाली. इतरांवर कधी कारवाई होणार याबाबत विचारले असता ते बोलत होते.
आयुक्त पाटील म्हणाले की, दोषी ठेकेदारांना अभय देण्याचा प्रश्न नाही. त्यांच्याबाबत फौजदारी कारवाई केली आहे. चौकशीत दोषी नाहीत, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही; तसेच रस्ते व गटार सफाई आणि कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी समितीने केलेल्या शिफारशीनुसार कारवाई केली जात आहे. त्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून कार्यवाही सुरू आहे. पुराव्यानिशी तक्रार केल्यास दोषी ठेकेदारांची हयगय केली जाणार आहे. दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
















