- म्हणाले ‘येत्या दोन दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही काय करतोय ते पहा’..
- गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा इकडे येण्याची वाट बंद – चंद्रकांत पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२१) :- अनेक भाजपा नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असल्याचं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच पिंपरी-चिंचवड शहरात केल होतं. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
ते म्हणाले की, “प्रत्येकाचं आपलं प्लॅनिंग असतं, त्यामुळे ढोल वाजवण्याचं काही कारण नाही. दोन दिवसांमध्ये आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये काय करतो ते पाहा. ढोल वाजवण्याची गरज नाही. आम्हाला शांतपणे काम करण्याची सवय आहे. तुम्ही कितीही माणसं पळवण्याचा प्रयत्न करा, शेवटी लोकांचं मोदींवर प्रेम आहे. लोकांचं त्या नगरसेवकावर प्रेम नाही. जाणाऱ्याने विचार करावा. पुन्हा इकडे येण्याची वाट बंद आहे.”
“सनसनाटी बातम्या निर्माण केल्याने काही होत नाही. २०-२२ महिन्यांपासून हे असंच चाललंय. आमच्या एकाही आमदाराला ते हात लावू शकले नाहीत. उलट आम्ही पंढरपूर जिंकलं आता आम्ही देगलूर जिंकण्याच्या दिशेने आहोत आणि हे परवा पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन असं बोलले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका माझ्या नेतृत्वाखाली…स्वतःला किती लहान करुन घेतलं”. मला हे कळत नाही की अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पिंपरी-पुण्याचे? पूर्ण कोविड काळात ते नागपूरला गेले, चंद्रपूरला गेले, गडचिरोलीला गेले, भंडाऱ्याला गेले असं कधी कळलंच नाही.
















