- पिंपरी चिंचवड शहरात लाडक्या गणरायाला चैतन्यमय वातावरणात निरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ सप्टेंबर २०२१) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी पिंपरी चिंचवड शहरात गणेशभक्तांनी कुठल्याही प्रकारची मिरवणुक न काढता, गर्दी न करता; मर्यादित भक्त परिवारासह नियमांचे पालन करीत “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” ‘एक दोन तीन चार; कोरोनाला करु हद्दपार’ अशा घोषणा देत मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायांना आज रविवारी (दि. १९) रोजी भावपूर्ण निरोप दिला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या सावटामुळे यंदा पिंपरी-चिंचवडकरांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी केले होते. याला शहरातील नागरीकांनी प्रतिसाद दिला.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांना परवानगी नसल्यामुळे सनई चौघड्यांचे मंगलमय सूर वगळता, चैतन्यमय वातावरणात अनंत चतुर्दशीच्या दिवसाला सुरुवात झाली. दहा दिवस मनोभावे लाडक्या गणरायाची सेवा केल्यानंतर शहरात सार्वजनिक मंडळांची आणि नागरिकांची लगबग सुरु होती. घाटांवर गणेशमूर्ती विसर्जनाला बंदी असल्यामुळे महापालिकेच्या वतीने १२८ मूर्ती संकलन केंद्रांची सोय करण्यात आली होती. प्रत्येक प्रभागात ४ मूर्ती संकलन केंद्रांची सोय होती. मूर्तीदान स्विकारण्यासाठी ४० फिरते रथ आणि निर्माल्य संकलनासाठी वेगळी वाहने उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांची सोय झाली.