- महापौरांनी केला मेट्रोने संत तुकाराम नगर ते फुगेवाडी प्रवास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरात आगामी काळात सुरु होणा-या मेट्रो सेवेबाबत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आज संततुकारामनगर येथील मेट्रो स्टेशन येथे प्रत्यक्ष भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. डिसेंबर २०२१ अखेर नागरिकांसाठी मेट्रो सेवा उपलब्ध करून देणेबाबत नियोजन करावे, अशा सूचना महापौर माई ढोरे यांनी दिल्या. संततुकाराम नगर ते फुगेवाडी व फुगेवाडी ते संततुकारामनगर अशी ट्रायल रन घेण्यात आली.
यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मेट्रो प्रकल्पाचे डायरेक्टर व्ही. के. अग्रवाल, जनरल मॅनेजर हेमंत सोनावणे, चीफ प्रोजेक्ट मॅनेजर संदीप दुबे, चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ऑफ ट्रॅक बी. रविकुमार, महापालिका उपअभियंता संतोष पाटील, माहिती व जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, नागरिकांसाठी मेट्रो प्रकल्प हा शहराच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शहराच्या नावलौकिकात भर टाकणारा हा प्रकल्प असून उर्वरीत मेट्रो प्रकल्पाची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करुन डिसेंबर २०२१ पर्यंत मेट्रो सुरु करावी.