- महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार?..
- शिवसेना-राष्ट्रवादी तयार मात्र, कॉंग्रेस संभ्रमात?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- महाविकास आघाडीने राज्यातील प्रमुख १५ महापालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याबाबत तयारी सुरु केली असल्याचे खात्रीदायक वृत्त हाती आले आहे. ‘एक वॉर्ड, एक सदस्य’ प्रभाग पद्धतीला तिलांजली देऊन राज्यातील महानगरपालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार केला आहे, असे समजते.
शिवसेनेला चार सदस्यीय प्रभागरचना तर, राष्ट्रवादी दोन सदस्यांसह चार सदस्यीय प्रभागरचनेलाही तयार असून प्रभागरचनेबाबत काँग्रेसमध्ये मात्र संभ्रमाची स्थिती आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांना एक सदस्य प्रभाग हवा आहे, तर काहींना दोन सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे, अशीही सूत्रांनी माहिती दिली.
महापालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेबाबत महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या नेत्यांची सोमवारी बैठक झाली. महापालिकांच्या प्रभागांची रचना आणि आरक्षण यावर बैठकीत चर्चा झाली. मात्र, कोणताही अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या प्रस्तावाला कॉंग्रेसची संमती मिळावी यासाठी नगरविकासमंत्र्यांनी कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केली, अशीही सूत्रांकडून माहिती मिळतेय. या प्रस्तावावर आज बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.