- चेन्नईतील इसमाकडून जवळपास शंभरहून अधिक महिलांची फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- चेन्नईतील प्रेमराज थेवराज या इसमाने एप्रिल महिन्यात मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून निगडीतील महिलेशी संपर्क साधला. तिच्याशी बनावट विवाह करून ११ लाख रुपयांची फसवणूक केली. तसेच अधिक पैशांची मागणी केली. फिर्यादी तरुणीने पैसे परत मागितले असता देण्यास नकार दिला. या प्रकरणामुळे फिर्यादी तरुणीने निगडी पोलिसात प्रेमराजच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
निगडी पोलिसांनी आरोपीला पुण्यातील विमानतळावरून सापळा रचून अटक केली होती. पोलिसांनी सात मोबाईल, १३ सिम कार्ड, दोन आधार कार्ड, दोन पॅन कार्ड आणि दोन ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केले होते.
दरम्यान तपासात आरोपीच्या गुन्ह्याची मोठी हिस्ट्री उघड झाली आहे. आरोपीने चेन्नई येथील तरुणी सोबत विवाह करून तिची ९८ लाखांची, ठाणे येथील तरुणीला विश्वासात घेऊन तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून ४५ लाखांची, पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणीची १२ लाखांची आणि हिंजवडी येथील तरुणीची २० हजारांची फसवणूक केल्याचं उघड झाले आहे. अजूनही तपास सुरु असून तपासात अटक केलेल्या आरोपीकडून जवळपास शंभरहून अधिक महिलांशी मॅट्रिमोनिअल वेबसाईटद्वारे संपर्क करून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. लेडीज वर्सेस रिकी बहल या हिंदी चित्रपटाला साजेशी अशी ही गुन्हेगारी स्वरूपाची घटना असून फसवणूक झालेल्यानी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.