- निघोजे परिसरातील मोरांचे कायमस्वरूपी संरक्षण व्हावे – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहर हद्दीलगत म्हणजेच तळवडे पासून ३ कि. मी. अंतरावर झाडी-झुडपे व मोठ्या प्रमाणात वृक्ष संपदा असणाऱ्या निघोजे (चाकण एमआयडीसी) गाव हद्दीच्या परिसरात गेल्या ५ वर्षांपासून मोरांचा वावर दिसत आहे. शेत परिसरात व त्या लगत असणाऱ्या पाणवठा व झाडी असणाऱ्या परिसरात ऑगस्ट – सप्टेंबर च्या कालावधीत दिवसाही सध्या मोरांचे दर्शन होते.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती पर्यावरण विभागाच्या पक्षी प्रेमींना सर्वप्रथम ऑगस्ट २०१७ मध्ये ४ मोर व लांडोर अश्या पक्ष्यांचे दर्शन झाले. ह्या महिन्यामध्ये ११ मोर व लांडोर पक्ष्यांचे दुपारच्या शांत वेळेमध्ये शेतात वावरताना विलोभनीय असे दर्शन होत आहे. क्वचित दिसणाऱ्या ह्या पक्षांच्या संख्येत गेल्या २ वर्षात वाढ नोंदली गेली. ही पक्षीप्रेमींसाठी व आपल्या शहरासाठी आनंदाची बाब आहे. पावसाळ्याच्या मध्यावर म्हणजेच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या सुमारास पक्षीनिरक्षण करणाऱ्याचे पाय आपोआप ह्या परिसराकडे वळतात. विविध रंगी पोपट, धनेश, कोकिळा व मोर यांच्यासाठी हा परिसर गेल्या पाच वर्षांपासून वरदान ठरत आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व पक्षीप्रेमी विजय पाटील म्हणाले,” चाकण एमआयडीसीच्या स्थापनेनंतर खेड तालुक्याला राज्यात विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पिंपरी चिंचवड व चाकण परिसरातील निघोजे, म्हाळुंगे, खालुंब्रे, आंबेठाण ही गावे आता तासाभराच्या वाहतुक परिघामध्ये आलेली आहेत. ही गावे कंपन्यांमुळे वेगाने कात टाकत आहेत. परंतु, उपजतच निसर्ग सौदर्य लाभलेल्या या गावांमध्ये आता मनुष्यहस्तक्षेपामुळे पक्षांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एमआयडीसी प्रशासनाने पर्यावरण अभ्यासकांना बरोबर घेऊन काही भागाचे सर्वेक्षण करून पक्ष्यांचा अधिवास असणाऱ्या महत्वाच्या भागास संरक्षित करणे आवश्यक आहे. सन २०१७ पासून समितीचे पक्षीप्रेमी व पर्यावरण अभ्यासक संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, विजय मुनोत व मी स्वतः या परिसरात पक्षी निरीक्षण करत आहे. मोर हा सामाजिक व्यवस्था जपणारा पक्षी असून, शेतकऱ्यांचा मित्रच असतो. पाली, बेडूक,कीटक ,धान्य असे बहुभक्षक अन्न खात असल्याने शेत परिसरात त्याचा वावर असतो. मोर तसेच लांडोर असे नर व मादी पक्षी आठ ते दहा जणांच्या समूहामध्ये ते राहताना निघोजे परिसरात आढळून येत आहेत. सकाळी व दुपारच्या शांत वेळेत पिसारा फुलवून पक्षी प्रेमींना विलोभनीय दर्शन देत आहेत. जमिनीवर तीन ते चार अंडी मादी लांडोर घालत असते. २६ जानेवारी १९६३ रोजी आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून नोंद आहे. मोर संरक्षित पक्षी असून त्याची शिकार करणे गैरकानुनी आहे. निघोजे परिसरातील ह्या मोरांचे कायम स्वरूपी संरक्षण व्हावे असे समितीला वाटते.”