- न्यायाधीश, पोलीस आयुक्त, महापालिकेचे अति. आयुक्त यांची उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- जिल्हा विधी प्राधिकरण सेवा पुणेच्या वतीने येत्या शनिवारी (दि. २५) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीच्या उद्घाटनप्रसंगी मोरवाडी न्यायालयातील सर्व न्यायाधीश , पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे महापालिकेचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर तसेच वकील उपस्थित राहणार आहेत.
मोरवाडी न्यायालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणा-या या लोक अदालतीमध्ये तडजोडीचे दावे सामंजस्याने तत्काळ निकाली काढले जाणार आहेत. त्यामुळे पक्षकारांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचणार आहे. पक्षकारांनी या लोकअदालतीमध्ये आपले दावे मांडून ते कायमस्वरुपी सोडविण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोरवाडी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. आर. पठाण यांनी केले. यावेळी न्यायाधीश आर.एस, वानखेडे, पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेटस् असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गोरखनाथ झोळ, अँड. अमोल शिंदे, अँड. मंगेश नढे, ॲड. ऋतुराज आल्हाट, अँड. कृष्णा वाघमारे उपस्थित होते.
या लोकअदालतीमध्ये तडजोड होऊ शकणारे दावे निकाली काढले जाणार आहेत. यामध्ये चेक बाऊन्स होणे, वैवाहिक दावे तसेच तडजोड होऊ शकणारे किरकोळ दाव्यांचा समावेश आहे. याशिवाय बँका पतसस्था, महावितरण, बीएसएनएल यांची थकीत बीले व चेक बाऊन्सच्या दाव्यांबरोबरच कामगार वाद प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे, नोकरीबाबतची प्रकरणे ज्यामध्ये पगार, इतर भत्ते व निवृत्तीबाबतचे फायदे इतर दिवाणी दाव्यांचीदेखील सुनावणी घेऊन तत्काळ निकाल दिला जाणार आहे. त्याकरिता तक्रारदार व आरोपी असे दोन्ही पक्षकार हजर असणे आवश्यक आहे.