- अद्यापही ८०१५ दुबार मतदारांची नावे मतदार यादीत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- पुणे जिल्ह्य़ातील मतदार यादीमध्ये असलेल्या दुबार मतदारांची नावे वगळण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार आतापर्यंत ६० हजार ७३२ मतदार मतदार यादीतून ‘बाद’ झाले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील १२ हजार २१४ दुबार मतदार वगळण्यात आले आहेत.
मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असल्यास नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाकडे माहिती देणे आवश्यक असते. मात्र, नागरिकांकडून ही माहिती देण्यात येत नाही. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यावर अनेक नागरिकांकडून जुन्या ठिकाणी असलेले मतदार यादीतील नाव कमी न करता नव्या ठिकाणी नोंदणी करण्यात येते. त्यामुळे दुबार मतदारांची संख्या वाढली आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदार संघामध्ये २० हजार १६९ दुबार मतदार होते. त्यातील १२ हजार २१४ दुबार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अद्यापही ८०१५ दुबार मतदारांची नावे मतदार यादीत असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.