- घासून नव्हे तर ठासून निवडून येईल, असा आत्मविश्वास बाळगा..
- संजय राऊत यांचा शिवसैनिकांना कानमंत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०२१) :- शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज रविवारी पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना भोसरीत मार्गदर्शन केले. शिवसैनिकांना पक्ष कमी पडला, पक्ष बांधणी झाली नाही, असे म्हणणे योग्य नाही. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. भविष्यकाळ शिवसेनेचा आहे, असा कानमंत्रही दिला. यावेळी संजय राऊत यांनी दिल्लीतला पत्ता सांगताना मी नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहतो, असंही सांगितलं.
प्रभाग दोनचा होणार की तीनचा याचा विचार करत बसू नका, घासून नव्हे तर ठासून निवडून येईल, असा आत्मविश्वास बाळगा, असेही त्यांनी सांगितले. राऊत म्हणाले, मी अनेक वर्ष दिल्लीत राहतो. नरेंद्र मोदी माझ्या समोर राहतात असा नेहमी पत्ता सांगतो. ही शिवसेनेची कृपा आहे. देशाची राजधानी इतकी मोठी तिथं लोकं आपल्यालाला ओळखतात. मी सांगतो नरेंद्र मोदीजी के सामने रहता हूं, अगर उनको पुछोगे नरेंद्र मोदी को तो वह कहेंगे मै संजय राऊत के सामने रहता हूं, असं सजंय राऊत मिश्किलपणे म्हणाले.
”पुणे, पिंपरी – चिंचवड महापालिकांमध्ये भगवा फडकत नाही, याची खंत वाटते. शिवसेनेचे खासदार – आमदार निवडून येतात, पण महापालिका निवडणुकीत फुगा फुटतो. मागील निवडणुकीत चारच्या पॅनेल होते म्हणून पराभव झाला असे म्हणणे योग्य नाही. आपला पाया ढेपाळला होता, संघटनात्मक बांधणी कमकुवत होती, हे मान्य करायला हवे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका यंदा होता कामा नये. महाविकास आघाडी होईल का नाही, झाली तर काय, नाही झाली तर काय, या भानगडीत पडू नका. निवडणुका एकट्याच्या जीवावर लढायची सवय आपल्याला आहे. सगळया जागांवर स्वबळावर लढायची आपली तयारी आहे. मात्र, स्वाभिमान सोडून, भगव्या झेंड्याशी तडजोड करुन आघाडी होणार नाही. आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय, असे शिवसेनेचे धोरण आहे. असंही ते म्हणाले आहेत.”प्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी – चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता येईल, असा आशावादही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किल सल्ला दिला आहे. “अजित दादा, आमचं ऐका, नाहीतर गडबड होईल”, असं संजय राऊत यांनी म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली! पालकमंत्री आपले नाहीत. राज्यात जरी सत्ता असली, तरी या भागात आपलं कुणी ऐकत नाही असं म्हणतात. पण असं होता कामा नये. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकतात. आपण त्यांना सांगू, दादा ऐकलं तर बरं होईल. नाहीतर मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत आज”, अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यानी यावेळी केली.
“आघाडी होईल का, नाही झाली तर काय? त्या भानगडीत कशाला पडायचं आपण? आपल्याला एकट्यानं लढण्याची सवय आहे. आलात तर तुमच्याबरोबर, नाहीतर तुमच्या शिवाय. कशाकरता आपण रेंगाळत बसायचं. आपण सगळ्या जागांची तयारी केली पाहिजे. उद्या आपल्यासमोर चर्चेला बसतील. मग या घ्या, त्या घ्या. आपण सन्मानाने आघाडी करण्याचा प्रयत्न करू. पण स्वाभिमान सोडून भगव्या झेंड्याशी तडजोड आपण करणार नाही हे लक्षात घ्या. एकदा ठरलं लढायचं म्हटल्यावर आपण लढू”, असं देखील संजय राऊत यांनी भोसरीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
















