न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ३ जुलै रोजी विधानभवनात संयुक्त बैठक होणार आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या मागणीनंतर ही बैठक आयोजित करण्यात आली असून, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह पिंपरी-चिंचवड व मावळातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत शहराच्या वाढत्या पाणीगरजा आणि मावळमधील शेतकरी व ग्रामस्थांच्या हिताचा समतोल साधत सर्वमान्य तोडगा काढण्याचा प्रयत्न बैठकीत होणार असल्याचे आमदार लांडगे यांनी सांगितले. महायुती सरकारने यापूर्वी प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश रद्द केल्यानंतर प्रकल्पाला चालना मिळाली असून, या बैठकीत सुमारे ४० लाख पिंपरी-चिंचवडकरांच्या पाणीप्रश्नाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















