- १२०० पानी दोषारोपपत्र ठरले निर्णायक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २५ जून २०२६) :- पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासाची संपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणात एकूण ८२ साक्षीदारांपैकी ५५ साक्षीदारांची न्यायालयात साक्ष नोंदविण्यात आली असून, भक्कम पुरावे आणि प्रभावी तपासाच्या जोरावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात यश आल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिली.
संदीपसिंह गिल यांनी सांगितले की, घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. नागरिकांनी मोर्चे आणि आंदोलने करत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या तपासासाठी सात ते आठ विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज, सायबर विश्लेषण, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची प्रत्येक कडी जोडत पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. तपासादरम्यान आरोपी आणि पीडितेला घटना घडण्यापूर्वी एकत्र पाहिल्याचे सांगणारे महत्त्वाचे साक्षीदारही पोलिसांना मिळाले.
या प्रकरणात सुमारे १२०० पानांचे सविस्तर दोषारोपपत्र तयार करण्यात आले. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन तपास पूर्ण केला. मजबूत पुरावे, वैज्ञानिक तपास आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयात आरोपीविरुद्धचा गुन्हा यशस्वीपणे सिद्ध करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी सांगितले.
















