न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २५ जून २०२६) :- छत्रपती चौक, पिंपळे सौदागर येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. विशेषतः जी. के. गुरुकुल शाळा सुटण्याच्या वेळेत तसेच सकाळ, दुपार व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांना एक ते दोन तासांपर्यंत वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत होते.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. सौ. कुंदाताई संजय भिसे यांनी आज संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांशी चर्चा करून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झालेले असतानाही किरकोळ कामांसाठी संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक कोंडी अधिक वाढत असल्याचे निदर्शनास आणून देत डॉ. भिसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना किमान एक मार्ग (वन-वे) तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच येत्या दोन दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी खुला करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांबाबत संवेदनशील राहून त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे आणि नगरसेविका अनिताताई काटे यांच्या साथीने आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. कुंदाताई भिसे यांनी यावेळी सांगितले.
















