- आमदार महेश लांडगे यांची महापालिका प्रशासनाला सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ जून २०२६) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाळगाव विखली येथील फेज-२ अंतर्गत सुरू असलेली सर्व प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात इमारतीचे इलेव्हेशन, सोलर प्रणाली, लिफ्ट, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, खेळाचे मैदान, कंपाऊंड वॉल, गणित व भूगोल प्रयोगशाळा, डान्स रूम, इलेक्ट्रिकल कामे, सभागृह तसेच इतर मूलभूत सुविधांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या रखडलेल्या कामांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शैक्षणिक सुविधांवर परिणाम होत असल्याचे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे. आवश्यक निधी, मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध करून संबंधित विभागाने फेज-२ मधील सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशी मागणीही त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.















