- पिंपरी चिंचवड महापालिकेकडून सन्मानासाठी निमंत्रण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ३९ वा वर्धापन दिन दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालेली असून सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने नुकताच ठराव मंजूर केलेला आहे. त्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ साली झेंडावंदन सोहळा पाहिलेल्या त्यावेळी वयाची १८ वर्षे पूर्ण असलेल्या भाग्यवंतांचा महानगरपालिकेच्या वतीने सन्मान केला जाणार आहे.
यासाठी १५ ऑगस्ट १९४७ रोजीचा झेंडावंदन सोहळा प्रत्यक्ष पाहणा-या त्यावेळी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील भाग्यवंतांनी त्यांची नावे, आधारकार्ड झेरॉक्स, मोबाईल क्रमांकासह महापालिकेच्या नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये द्यावीत अथवा mayor@pcmcindia.gov.in किंवा pro@pcmcindia.gov.in या ई-मेल वर पाठविण्यात यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शहरवासियांना केले आहे.
















