- विद्यार्थ्यांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी राज्याचे महत्वाचे पाउल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहरात महाविद्यालयीन विद्यार्थी कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये यासाठी शासनाच्या वतीने ” युवा स्वास्थ मिशन ” योजना राबवली जाणार आहे. शहरातील एकूण २३ महाविद्यालयांमधील सर्व विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाने तयारी सुरू केली आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीमध्ये युवा स्वास्थ मिशन ही योजना राबवली जाणार आहे. त्यासंदर्भात वैद्यकीय विभागाने सोमवारी (दि. २५) शहरातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेऊन संवाद साधला. प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची संख्या त्यांच्याकडून घेतली जात आहे.
त्या संख्येवारीनुसार पालिकेच्या वतीने लसीकरण मोहिम आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्या विद्यार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार आहे. एकही लस घेतलेली नसलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. लसीकरण त्या – त्या महाविद्यालयात केले जाणार आहे. येत्या २ नोव्हेंबरपर्यंत लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.