- बसच्या चालक व वाहकामुळे जीवितहानी टळली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ ऑक्टोबर २०२१) :- प्रवाशांना घेऊन निघालेल्या पीएमपीएल बसने आज बुधवारी (दि. २७) रोजी रस्त्यातच अचानक पेट घेतला. चालकाची केबिन आणि प्रवाशांच्या चाळीस टक्के आसन व बसचा पुढील भाग आगीत जळून खाक झाला. बसचे चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत त्वरित प्रवाशांना खाली उतरविले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
ही बस पिंपळे गुरव इथून मार्केट यार्डकडे जात होती. या सीएनजी बसचा क्र. एम एच १२ एच बी १४३८ असा आहे. दापोडी ते पिंपळे गुरवला जोडणाऱ्या होडीचा पूल इथे पवना नदीवरील पुलावर ही घटना घडली. रस्त्यावरील वाटसरूने अग्निशामक दलास फोन करून घटनेची माहिती दिली.
काही वेळेतच अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तसेच कर्मचाऱ्यांनी बसच्या आगीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती. तसेच रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. सांगवी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचा-यांनी वाहतूक सुरळीत केली, अशी माहिती अग्निशामक विभागाने दिली.