- ध्वनिप्रतिबंधक यंत्रणा इतर तत्सम कामांसाठी नगरसेवक शैलेश मोरे यांचा पुढाकार..
- पालिकेचे अधिकारी आणी ठेकेदाराची उड्डाणपूलास भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२१) :- चिंचवडमधील एम्पायर इस्टेट येथे मदर टेरेसा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. नागरी वस्तीतून हा उड्डाणपूल जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ध्वनी प्रतिबंधक यंत्रणा व इतर तस्तम कामे होणे आवश्यक आहे. रॅम्प व उणपुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यावर ध्वनिप्रतिबंधक उपाय म्हणून पत्रे बसविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते. मात्र, ते काम अद्यापही अपूर्णावस्थेतच आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांनी उड्डाणपुलावरील अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा केला होता.
महापालिकेचे अधिकारी आणि सबंधित ठेकेदार यांनी आज गुरुवारी (दि. २८) रोजी एम्पायर इस्टेट येथील मदर टेरेसा उड्डाणपूलाची व अर्धवट कामाची पाहणी केली. नगरसेवक मोरे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत, वाहतुकीच्या आवाजाचा रहीवाशांना किती त्रास होतो, याबाबत अधिकारी व ठेकेदारांची कान उघडणी केली.
नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेने जवाहरलाल नेहरू नागरी पुननिर्माण अभियानाअंतर्गत (जेएनएनयूआरएम) ११ किलोमीटर अंतराचा काळेवाडी फाटा ते देहू – आळंदी या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत सुमारे १ हजार ६०० मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे. उड्डाणपुलामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. अगोदरच दोन्ही बाजूला रॅम्प उतरविल्यामुळे सोसायटी परिसरात वर्दळ वाढली आहे. ही वर्दळ रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. वाहनांच्या आवाजाचा नागरिकांना त्रास वाढला आहे. उड्डाणपुलावर ध्वनी प्रतिबंधक यंत्रणा, दिशादर्शक फलक बसविणे व इतर अनेक कामे अपूर्ण आहेत. ती मार्गी लावण्यासाठी पालिकेकडे तगादा लावला होता. अखेर सोमवार (दि.१ नोव्हेंबर २०२१) पासून उर्वरित काम सुरू करण्याचे अधिकारी व ठेकेदाराने मान्य केले आहे. कामाला दिवाळीनंतर गती येणार असून नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या मध्यापर्यंत अपूर्ण काम पूर्ण होईल, अशी माहिती नगरसेवक मोरे यांनी दिली.