- महासभेत सत्ताधारी भाजपचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) :- नवीन मिळकतींची स्वत: हून करसंकलन विभागाकडे नोंदणी करणाऱ्या नागरिकांना सामान्य करात ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. तसा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वासाधारण सभेत उपसूचनेद्वारे गुरुवारी (दि. १८) घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
पालिकेच्या वतीने उत्पन्नवाढीसाठी ‘ माझी मिळकत, माझी आकारणी ‘ ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये जे नोंद नसलेले मिळकतधारकांनी स्वयंस्फूर्तीने मिळकतकर आकारणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन यापूर्वी आयुक्त राजेश पाटील यानी केले आहे. दरम्यान, या नागरिकांना सामान्य करामध्ये ५ टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने ही करसवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात मोठ्या संख्येने नव्याने आणि वाढीव बांधकामे झालेली आहे. या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने करसंकलन कार्यालयात जाऊन कर आकारणीसाठी नोंद केल्यास त्यांना ही सवलत मिळणार आहे. सवलत योजनेचा नागरिकांना लाभ होणार आहे. तसेच, पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे, असे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.