- पोलिसांचा वाढलाय वॉच; पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा कर्तव्यदक्ष निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) :- स्ट्रीट क्राइमसह घरफोडी आणि चोरींच्या घटना होऊ नयेत म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ‘ क्युआर ‘ कोड स्कॅन करून गस्तप्रणाली सुरू केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंभरहून अधिक जागेवर क्युआर कोड लावण्यात आले आहेत. गस्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना हा क्यूआर कोड आपल्या मोबाइलवर स्कॅन करावा लागत असल्याने शहरातील गस्त अधिक सक्रीय झाल्याने ती प्रभावी ठरू लागली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सुरुवातीपासून प्रयत्न चालविले आहेत. शहरातील सर्व अवैध धंदे बंद केले आहेत. मात्र, एटीएम फोडीच्या घटनांमध्ये परप्रांतीयांच्या गुन्हेगारी टोळ्या शहर पोलिसांची डोकेदुखी ठरल्या आहेत. वारंवार गुन्हे घडणारे परिसर आणि रस्त्यांवर पोलिसांनी क्यूआर कोड लावले आहेत. प्रत्येक पोलीस चौकीच्या हद्दीत असलेल्या बीट मार्शलला त्या – त्या भागात जाऊन क्युआर कोड स्कॅन करावा लागत आहे.
क्यूआर कोड लावलेल्या ठिकाणांमध्ये सर्व एटीएम सेंटर, धार्मिक स्थळे, पुतळे, शाळा, बँका, सराफांची मोठी दुकाने यांचा समावेश आहे. पूर्वी रात्रीच्यावेळी एक बीट मार्शल जागा राहून नियंत्रण कक्षाकडून येणारे कॉल ऐकत असे. तर त्याचा सहकारी विश्रांती घेत असे. अनेकदा काही भागात पोलीस गस्तच होत नव्हती. मात्र गुन्हा घडूच नये यासाठी पोलिसांनी नवीन उपाययोजना केली आहे. आता क्युआर कोड मोबाईलने स्कॅन केल्यानंतरच गस्त पूर्ण होत आहे. स्कॅन करताच पोलीस त्या ठिकाणी पोहचले आहेत. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि कंट्रोल रूमला मिळणार आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.