न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जाने.) :- राज्यात यंदा दुष्काळस्थिती असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरण क्षेत्रातही यंदा कमी पाऊस झाला. परिणामी पाणीबचतीचे धोरण अंवलंबविले जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही पाणीकपात करण्य़ास पाटपंधारे विभागाकडून सुचित केले जात आहे. परंतु, राजकीय दबावापोटी पदाधिकारी कपातीचा निर्णय घेत नाहीत.
पाटबंधारे मंडळाने पुन्हा पालिकेला १० टक्के पाणीकपात करण्यास बजावले आहे. रावेत बंधा-यावरून पवना नदीतून ४८० एमलडीहून अधिक पाणी उचलते. १० टक्के कपातीप्रमाणे पालिकेने ४० एमएलडी कमी पाणी नदीतून उचलावे, असे म्हटले आहे. या पत्राप्रमाणे पाणीपुरवठा विभागाने महापौर जाधव यांना पाणीकपातीची चर्चा करण्यासाठी गटनेत्यांची बैठक घेण्याबाबत विनंती केली आहे.
त्या संदर्भात महापौर जाधव म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पवना धरणाती पाहणी केली असून ६० टक्के पाणीसाठा आहे. पाणी पातळी कमी होत असली, तरी हा साठा मुबलक आहे. अद्याप कपातीचा विचार झालेला नाही. मात्र, आवश्यकतेनुसार गटनेत्यांची बैठक घेऊन कपातीबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.











