- आ. जगताप आणि माझा तिकीट वाटपासह पद वाटपामध्ये सामोपचाराने निर्णय..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात पद आणि तिकीट वाटपाच्या निर्णयासाठी आता पिंपरी-चिंचवडकर ‘आत्मनिर्भर’ आहेत. भारतीय जनता पार्टीच्या सत्ताकाळात कोणत्याही नगरसेवकाला पद मिळवण्यासाठी शहराबाहेरील नेत्यांचे उंबरे झिजवावे लागले नाही. भाजपामध्ये शहरातील निर्णय शहरात घेण्याचे स्वातंत्र्य आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि मी तिकीट वापट आणि पद वाटपामध्ये सामोपचाराने निर्णय घेत असतो. त्यामुळे आम्हाला शहराचे निर्णय घेण्यासाठी शहराबाहेर जावे लागत नाही, असा दावा भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केला.
चिखली येथे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार लांडगे बोलत होते.
स्थायी समिती, क्रीडा समिती, शहर सुधारणा समिती, विधी समिती अशा विविध समित्यांवर समाविष्ट गावांतील नगरसेवकांनी कामे केली आहेत. त्यामुळे प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाची कामे पोहोचली, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
‘‘आपला विश्वास अशा व्यक्तींवर ठेवा. जो आपले काम करेल. आपल्या अडचणीत उभा राहील. कोणी खूप सुंदर दिसतो म्हणून मतदान करु नका किंवा कोणी आपल्या नात्यातला आहे म्हणून मतदान करु नका. जो विकासाची कामे मार्गी लावण्याची क्षमता आणि समस्या सोडवण्याची धमक ठेवतो. त्याच व्यक्तीला मतदान करा,’’ असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.