- आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या कार्तिकीसाठी देहूत लगबग; संस्थांनाकडून जोरदार तयारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. नोव्हेंबर २०२१) :- अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान व प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे.
गत वर्षी कोरोनाचा प्रभाव असल्याने कार्तिकी एकादशीला शासनाने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे वारकऱ्यांनी श्री संत तुकाराम महाराराजांचे दर्शन घेण्यासाठी १८ महिन्यांची वाट पाहावी लागली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिवर्षी भाविक व कोकणातून येणाऱ्या दिंड्या मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर देहू नगरपंचायत व संस्थानच्या वतीने तयारी सुरू आहे.
कार्तिकी एकादशी ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यापर्यंत भाविकांची गर्दी असणार आहे. हे गृहीत धरून देहू – आळंदीमार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या जादा बसेसची व्यवस्था सोडण्यासाठी संस्थानच्या वतीने पत्रव्यवहार करणार आहे. मंदिराच्या आवारात आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत नगरपंचायत व आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली.
यात्रेपूर्वी मंदिराचे व दर्शनबारीचे व परिसराचे सॅनिटायझेशन करणार आहे. मंदिर प्रत्येक तासाने सॅनिटाईझ करण्यासाठी थोडा वेळ दर्शनासाठी बंद ठेवले जाईल. भाविकांना दर्शनबारीतून सोडणार आहेत. तर दिड्यांना प्रदक्षिणेसाठी महाद्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी भाविकांना ५०-५० च्या गटाने दर्शनासाठी सोडण्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे.