- विभागीय आयुक्तांचा आदेश; त्या निविदा प्रक्रियेत कुटुंबाच्या सदस्याचा सहभाग सिद्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ नोव्हेंबर २०२१) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांचे पद रद्द करण्यासाठी माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी केलेल्या अर्जाला विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी (दि. २४) रोजी मान्यता दिली असून त्याबाबत आदेश जारी केला आहे.
सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, उपरोक्त कंपनीस दिर्घ मुदतीचे कर्ज हे सुलक्षणा शिलवंत यांनी दिलेले दिसून येत आहे. सदर कर्ज अस्तित्त्वात नसलेबाबत कोणताही पुरावा त्यांच्याकडून सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांचा कंपनीशी संबंध असल्याचे निदर्शनास येते. तसेच कंपनीशी संबंध असल्यामुळे मास्क खरेदी प्रक्रियेतीलही त्यांचा संबंध निदर्शनास येत आहे. त्यामुळे, महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सुलक्षणा शिलवंत यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध येत असल्याने महापालिका अधिनियम १९४९ कलम १० (फ), पोटकलम (२) व कलम ११ (ड) मधील तरतुदीनुसार पालिका सदस्य या नात्याने सदस्य म्हणून पदावर राहण्यास अनर्ह आहेत, अशी माझी धारणा आहे. त्यामुळे उपरोक्त तरतुदीनुसार त्यांना अनर्ह करावे, असा माझा निष्कर्ष आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मे. एडिसन लाईफ सायन्स प्रा. लि. या कंपनीने करोना काळात शहरातील झोपडपट्टीमधील नागरिकांना मास्क वाटप करण्यासाठी दहा लाख रुपयांच्या मास्कची थेट खरेदी केली होती. त्यापोटी दहा लाख रुपये पालिकेने या कंपनीला अदा केले होते.
या कंपनीमध्ये सुलक्षणा शिलवंत यांचे पती राजू धर व त्यांचे बंधू राजरत्न शिलवंत हे संचालक असल्यामुळे माजी नगरसेवक व शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र ननावरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. लोकप्रतिनिधी संबंधित असलेल्या कोणत्याही कंपनीला अथवा संस्थेला आर्थिक फायद्यासाठी निविदा प्रक्रियेत सहभाग नोंदविता येत नाही. या याचिकेसंदर्भात न्यायालयाने विभागीय आयुक्तांना सहा आठवड्यात निर्णय घेण्यासंदर्भात आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज अंतिम निकाल जाहीर केला आहे.