न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी कॅम्पातील व्यापाऱ्यांनी पथारी व हातगाडीचालकांची अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. अन्यथा पिंपरी कॅम्प बंद करण्याचा इशारा दिला आहे.
त्यावर टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी आयुक्त हर्डीकर यांची भेट घेत, या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर ठेवलेल्या व विक्रेत्यांच्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना कॅम्पातून चालणे देखील मुश्किल झाल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे पिंपरी कॅम्पातील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरातील पिंपरी कॅम्प ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. इलेक्ट्रॉनिक्स व कापडासाठी ही बाजारपेठ प्रसिद्ध आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे शहर, मावळ तालुका व परिसरातील अनेक नागरिक याठिकाणी विविध वस्तू खरेदीसाठी येत असतात. मात्र, या बाजारपेठेत पथारी व हातगाडी चालकांचे अतिक्रमण वाढत असून, त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसाय करणे अवघड होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.











