- इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशला संयुक्त बैठकीचे आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या भोसरी कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांची भेट घेत, त्यांना निवेदन दिले आहे.
पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण सदस्य संतोष सौंदणकर, संघटनेचे अध्यक्ष गिरीष बक्षी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी असोसिएशनचे सचिव नितीन बोंडे, मनोज हरपळे, जावेद मुजावर, नटराज बोबडे, संजीव पाटील, प्रदीप पाटील, सुनील पवार, सुरज बराटे, अजय होणराव, मनोज सुखवाणी, दिलीप कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता उदय भोसले यांच्याकडून ग्राहक व ठेकेदार यांच्या कामांबाबत अडवणूक केली आहे. बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला त्यांचे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे अनेक गैरप्रकार होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या शिष्टमंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान नाळे यांनी तक्रारी ऐकून घेतल्या. येत्या दहा दिवसांत भोसरीत अधिकारी व ठेकेदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.