- स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिका आणि पोलिसांचा उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड शहर सुरक्षेसाठी स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिका आणि पोलिसांच्या मदतीने शहरातील चौकांमध्ये तीन हजार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही बसविणे आणि कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी आणखी काही जागा निश्चित केल्या आहेत. त्याबाबतही महापालिकेच्या वतीने साहाय्य केले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
पिंपरी – चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहर सुरक्षेसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. स्मार्ट सव्हिलन्स अंतर्गत महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या वतीने ६४० ठिकाणी दोन हजार कॅमेरे बसविण्याचे काम सुरु आहे. तसेच निगडीतील संत तुकाराम महाराज संकुलात स्वतंत्र कक्षही निर्माण केला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये हे कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. याबाबत पोलीस आयुक्त आणि महापालिका प्रशासनाची बैठक पिंपरीतील महापालिका भवनात आयुक्त दालनात मंगळवारी झाली.
यावेळी महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी नीळकंठ पोमण आदी उपस्थित होते.


















