- मुदतीत स्वहिस्सा रक्कम भरण्याबाबत महापौर, आयुक्तांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येत असणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चऱ्होली आणि बोऱ्हाडेवाडी या प्रकल्पासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांना स्वहिस्सा १०% रक्कम भरण्यासाठी दि. १५/१२/२०२१ ते दि. १५/०१/२०२२ दरम्यानची मुदत देण्यात आली आहे.
या प्रकल्पात ज्या लाभार्थ्यांची नावे विजेता यादीमध्ये आहेत व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे, अशा लाभार्थ्यांनी आपला १०% स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात दि. १५/१२/२०२१ पासून येऊन चलनाद्वारे आपली स्वहिस्सा रक्कम भरावी, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
या योजनेत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी एकुण ३६६४ सदनिका बांधण्यात येते आहे. त्यापैकी बोऱ्हाडेवाडी येथे १२८८ व चऱ्होली येथे १४४२ अशा सदनिका वाटप करणेसाठी मान्यता देण्यात आली आहे. निवड झालेल्या व ज्यांची कागदपत्रांची पडताळणी पुर्ण झालेली आहे, अशा लाभार्थ्यांची यादी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in/marathi/pmay_iresult.php या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. याबाबतची माहिती व निवड झालेल्या लाभार्थ्यांचे नावाची यादी झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग २०५ व्यापारी संकुल, भाजी मंडई शेजारी चिंचवडगाव पुणे ३३ या कार्यालयाच्या दर्शनी भागावर नागरीकांकरीता सुचना फलकावर लावण्यात आलेली आहे.