- राष्ट्रवादी महिला शहराध्याक्षाच्या नेतृत्वाखाली आगामी पालिका निवडणूकीला सामोरे जाणार?
- शहराध्याक्षपदासाठी दोन माजी महिला महापौर तथा एका नगरसेविकेचे नाव चर्चेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०२१) :- सत्ताधारी भाजपने पिंपरी चिंचवड शहरात सलग पंधरा वर्षे सत्ता भूषविणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता उलथवून सध्यातरी ‘एक नंबरचा पक्ष’ अशी स्वतःची इमेज निर्माण केलीयं. याउलट प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने अजूनही स्वतःला सत्तेच्या चौकटीतच बंदिस्त करून ठेवलयं. या गाढ निद्रिस्त अवस्थेतेतून पक्षासह स्वतःला बाहेर काढण्याची जबबदारी निभावणारे शहराध्याक्षदेखील ही मरगळ झटकण्यात सपशेल अपयशी ठरलेत, असे चित्र सध्या राष्ट्रवादीमय वातावरणात पहावयास मिळतेय.
२०१७ पासून आजपावतो भाजपमधील भ्रष्टाचाराची कित्येक प्रकरणे समोर आली. मात्र, पिंपरीतील आंबेडकर पुतळ्यासमोर तात्पुरता विरोध असल्याचे भासवून केवळ पक्षाचे झेंडे मिरवण्यातच पक्षाच्या शिलेदारांसह मावळ्यांनीदेखील धन्यता मानली. कोणतेही भ्रष्टाचाराचे प्रकरण तडीस नेण्याचे धारिष्ट्य दिवंगत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यानंतर हे पद भूषविणाऱ्या एकाही विरोधी पक्षनेत्याने दाखविले नाही. ही आजवरची राष्ट्रवादीची सर्वात खराब कामगिरी म्हणायला हरकत नाही. राज्यात राष्ट्रवादीच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याची आयतीच किमया देखील विरोधक राष्ट्रवादीला साधता आली नाही, हे पक्षाचे मोठे दुर्दव्यच म्हणावे लागेल. गत लोकसभा निवडणुकीत पार्थ पवारांच्या अनपेक्षित पराभवाची कारणीमिमांसा न करता चुकीच्या माणसांना पक्षाने पाठीशी घातले. त्यांना स्थायीची बक्षिसी मिळाली. विधानसभा निवडणुकीत चिंचवड आणि भोसरी मतदारसंघात उमेदवार देता न आल्याने पक्षाची नाचक्की झाली. भाजपच्या स्थायी सभापतींना झालेली अटक या विषयाला हात घालून रान पेटविण्याचे धारिष्ट्यदेखील पक्षाच्या शिलेदारांनी दाखविले नाही. ऐनवेळी कच खाल्ली. त्याचमुळे पिंपरी चिंचवडचे दादा नाराज आहेत. शिलेदारांना डावलले जात असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, महिला अध्यक्ष, युवक अध्यक्ष यांचा राजीनामा मागितल्याची चर्चा होती. परंतु कालांतराने ही केवळ फुग्यातली हवा ठरली.
सध्या राष्ट्रवादीच्या गटात शहरकारणात महिलांना संधी देण्याची मागणी जोर धरू लागल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. कारभाऱ्यांकडून त्याबाबत चाचपणी सुरु असल्याची माहितीही मिळतेय. त्यात माजी महापौर तथा नगरसेविका मंगला कदम, वैशाली घोडेकर, नगरसेविका सुलक्षणा धर-शीलवंत यांची नावे आघाडीवर असल्याचे कळतेय. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणूकीला शहर राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार? की जुन्यांना नेहमीप्रमाणे चुका करूनही संधी मिळणार, असा प्रश्न पक्षातीलच जाणकारांकडून उपस्थित होत आहे.