- राष्ट्रीय टेनिसपटू गौरव नाटेकर यांची पालिकेकडून सल्लागारपदी नियुक्ती?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२१) :- महापालिका शहरातील क्रीडा संकुलांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर मानांकनाप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक सुविधा पुरविणार आहे. त्यासाठी क्रीडाविषयक तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली सल्लागाराच्या विविध सुधारणाविषयक, आधुनिकीकरण व स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी राष्ट्रीय टेनिसपटू गौरव नाटेकर यांना सल्लागार म्हणून नेमण्यात येणार आहे. पालिका हद्दीतील क्रीडाविषयक सुविधांचे स्तर उंचावून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होणार आहे. तसेच क्रीडांगणाचाही विकास होणार आहे.
शहरातील फ प्रभागातील कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, निगडीतील सावरकर मैदान, संजय काळे मैदान, इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल आदी ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणे क्रीडाविषयक सुविधा पुरवण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मानांकनानुसार, विविध सुधारणाविषयक, नियोजनाच्या अनुषंगाने क्रीडाविषयक तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने आधुनिकीकरण व स्थापत्यविषयक कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामासाठी राष्ट्रीय टेनिसपटू गौरव नाटेकर यांची निविदापूर्व आणि निविदापश्चात कामांसाठी सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
नाटेकर यांनी २० ऑक्टोबर २०२१ रोजीच्या पत्रानुसार क्रीडा, स्थापत्यविषयक कामांसाठी स्वीकृत निविदा रकमेच्या २ टक्के दराने दरपत्रक सादर केले आहे. त्यानुसार, त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक केली जाणार आहे.