- आयुक्तांच्या कार्यपद्धतीविरोधात सत्ताधारी भाजप आंदोलनाच्या पवित्र्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२१) : आयुक्तांनी कामे अडवली आहेत. आता आम्हाला थेट आयुक्त हटाव म्हणून मोर्चा काढावा लागेल. लोकांच्या हिताची कामे ते अडवतात. करतो करतो म्हणतात आणि निमित्त काढून कामे अडवतात. आयुक्तांनी आडवा जिरवा धोरण अवलंबले आहे. प्रभागांतील असंख्य कामे त्यासाठी समिती नेमतात आणि थांबून ठेवतात. अगदी एककल्ली कार्यक्रम सुरू केला आहे. आयुक्तांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारची सुपारी घेतली आहे, असा गंभीर आरोप महापौर माई ढोरे यांनी केला.
सत्ताधारी भाजपच्या महापौर माई ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर नानी घुले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यावर थेट राष्ट्रवादीधार्जिणाचा शिक्का मारला आहे.
पुढे बोलताना महापौर ढोरे म्हणाल्या, प्रभाग रचनेत सुध्दा आयुक्तांनी राज्य शासनाच्या दबावाखाली काम केला असून त्या विरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी ३००० टॅब खरेदीचा आमचा आग्रह आहे, पण तो विषयसुध्दा आयुक्तांनी थांबवला. महिला बाल कल्याण योजनेतून महिलांसाठी वाहन प्रशिक्षण (ड्रायव्हींग) चा कार्यक्रम आम्ही सुचवला पण त्यालाही निमित्त काढू खोडा घातला. अनेक वार्डातील कामेसुध्दा थांबवली आहेत. कुठल्याही कामाचे टेंडर काढून देत नाहीत. शहरातील गरजू लोकांना तीन हजार रुपये अनुदान देण्यासंदर्भात देखील त्यांनी अडवणूक केली. आयुक्त है राष्ट्रवादी पक्षाच्या सांगण्यावरून अडवणूक करीत आहेत. आयुक्त हे आता आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत आहेत. आयुक्त शहराचे मालक आहेत? त्यांना मालक व्हायचे असेल तर त्यांनी निवडणुका लढवाव्यात, असा उपरोधिक टोला महापौरांनी आयुक्तांना लगावला आहे.
















