निवडणूक आयोगाकडून आराखड्यात बदल सुचविल्याची पालिका वर्तुळात चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची २०२२ ची निवडणूक तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने होणार आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार केला. महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने आयुक्त राजेश पाटील यांनी मागील आठवड्यात हा आराखडा आयोगाला सादर केला. प्रारूप प्रभाग रचनेच्या अंतिम आराखड्यात अनेक बदल सूचविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
निवडणूक आयोगाकडून काटेकोरपणे कच्च्या आराखड्याची तपासणी झाली. प्रभागातील लोकसंख्या योग्य प्रमाणात आहे का? नैसर्गिक प्रवाह, रस्ते, उड्डाणपूल सीमा मानून रचना केली आहे का? याची तपासणी बारकाईने केली. त्यात त्रुटी आढळल्याने निवडणूक आयोगाने काही बदल सुचविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त, निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त मुंबईतच तळ ठोकून आहेत. निवडणूक आयोगाने सूचविलेले बदल करण्यात येत आहेत.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड, पिंपरी आणि भोसरीतील काही स्थानिक नेत्यांकडून सूचना मागविल्या होत्या. मात्र, अंतिम आराखडा काय आहे, याचा सुगावाही लागू दिलेला नाही. तर काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी सुरू केल्या आहे. प्रारूप प्रभाग रचनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीतील एका खासगी एजन्सीची मदत घेतल्याची चर्चा आहे. रचनेसाठी २५ जणांची नेमलेली समिती केवळ नावालाच होती. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि दोन सहायक आयुक्त या चारजणांनीच कच्चा आराखडा तयार केला आहे. तसेच यासाठी दिल्लीतील एक टीमही कार्यरत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
















