- परिसरातील नागरिकांना होतोय त्रास..
- माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचा त्रागा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२१) :- पिंपरी चिंचवड शहरातील वाकड, रहाटणी व काळेवाडी या परिसरामध्ये आठवडी बाजाराच्या नावाखाली राजकीय बाजार भरविला जात आहे. सोसायटी गेट, फूटपाथवर बाजार मांडल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी केला आहे.
वाकडमध्ये थेट शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत मिळावा यासाठी आठवडी बाजार ही संकल्पना राबविण्यात येत आहे. मात्र याला राजकीय लोकांकडून हरताळ फासला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांकडून परिसरात आठवडी बाजार भरविले जात आहेत. सोसायटी, फुटपाथ आणि एखाद्याच्या खाजगी जागेत हे बाजार मांडले जात आहेत. मुळात फूटपाथवर अतिक्रमण करून बाजार भरविणे चुकीचे आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि इतर त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेताच हे अनधिकृत बाजार भरविले जात आहेत.
माजी नगरसेवक विनायक गायकवाड म्हणाले, वाकड परिसराचा सर्वांगीण विकास होत आहे. रत्यावर अतिक्रमण होऊ नये, वाहतूक कोंडी होऊ नये तसेच शेतकरी ते थेट ग्राहकांना भाजी मिळावी व विक्रेत्यांना हक्काची जागा मिळावी यासाठी सर्व सोयीयुक्त भाजी मंडई सुरू केली आहे. या मंडईत येणारा भाजीपाला देखील शेतकऱ्यांनी पिकविलेलाच आहे. हा भाजीपाला देखील ताजा आणि स्वस्त दरात विकला जातो. परंतु आठवडी बाजाराच्या आणि शेतकऱ्यांच्या नावाखाली काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचे गायकवाड म्हणाले.