- जागेला सीमाभिंत घालुन संरक्षित करा; विविध संघटनांची महापौरांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२१) :- त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पिंपरी येथील नियोजित स्मारकासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र जागा घोषित करण्यात आली आहे. या जागेवर असलेले अतिक्रमण हटवुन तेथे सीमाभिंत उभारावी अशी मागणी शहरातील विविध पक्ष संघटनांनी केली असुन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
महापौर माई ढोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्याच्या मागील मोकळी जागा या स्मारकासाठी देण्याचा निर्णय घोषित केला होता. या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे भव्य रचनात्मक स्मारक महापालिका उभारणार असल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले होते.
दरम्यान, शहरातील विविध पक्ष संघटनांच्या शिष्टमंडळाने महापौर ढोरे यांची भेट घेऊन त्या जागेवर अतिक्रमण आणि अनुचित प्रकार होत असल्याच्या तक्रारी मांडल्या. तसेच या जागेला सीमाभिंत घालुन संरक्षित करण्यात येऊन त्या जागेवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी, या जागेवर “माता रमाई स्मारकासाठी राखीव जागा” असा फलक लावावा, तेथील अतिक्रमणावर कारवाई करावी, या ठिकाणी रखवालदार नेमावेत अशा विविध मागण्या शिष्टमंडळाने केल्या. या मागण्यांची तात्काळ दखल घेत प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिले.
















