- डांगे चौकात सापळा रचून भोंदूबाबाला पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२१) :- काळेवाडी येथे राहणाऱ्या पीडित महिलेला आरोपीने फोन करुन पतीने त्यांना पांगळे करण्यास सांगितले असून तुमच्यात होणारे भांडण याबाबत मला माहित असल्याचे सांगितले. तसेच महिलेच्या पोटात दोन ते ती गाठी असल्याचे सांगून आयुष्य थोडेसे राहिले आहे, असे सांगून महिलेला भीती दाखवून वारंवार फोन करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
ज्या माणसाच्या उजव्या हाताचे तळहातावर व गुप्तांगावर तीळ आहे. त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला कोणीही काही करु शकणार नाही, असे आरोपीने पीडित महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने स्वत:चा एक अश्लिल व्हिडिओ पाठवून त्यात उजव्या हातावरील तीळ व गुप्तांगावरचे तीळ दाखवले. महिलेला व्हिडिओ पाठवल्यानंतर त्याने फोन करुन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तसेच माझ्याशी शरीरसंबंध ठेवले तर तुमचे सगळे कुटूंब सुखी राहील. तुम्हाला तुमचे कुटुंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा असे म्हणत वारंवार शरीरसुखाची मागणी करुन महिलेचा विनयभंग केला.
याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी शनिवारी डांगे चौकात सापळा रचला. आरोपीला ताब्यात घेऊन वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३५४ (ड), २९२, ५००, ५०९ माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ६७ (ए), नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज (वय ४१, रा. मु.पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
















