- १ तारखेपासून कोविन पोर्टलवर नोंदणीला प्रारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२१) :- येत्या दि. ०३ जानेवारीपासून वय वर्षे १५ ते १८ वयोगटामधील (जन्माचे वर्ष सन २००७ व त्यापुर्वीचे) मुलांचे कोविड १९ लसीकरण सुरु करण्यात येणार आहे, असे केंद्र शासनमार्फत सुचित करण्यात आले आहे. दि. ०१ जानेवारी २०२२ पासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुविधा उपलब्ध होणार आहे.
लाभार्थी स्वतः नोंदणी करू शकतात किंवा नोंदणीकरीता यापूर्वी कोविन पोर्टलवर असलेल्या खात्याद्वारे ऑनलाईन पध्दतीने किंवा युनिक मोबाईल नंबरद्वारे नवीन खाते तयार करून देखील नोंदणी करू शकतात. ही सुविधा सध्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. दि. ०३ जानेवारी २०२२ पासून लाभार्थी लसीकरण केंद्राचे ठिकाणी ऑन साईट पध्दतीने लसीकरण कर्मचारी यांचेकडे नोंदणी करु शकतात. तसेच या मार्गदर्शक सूचना दि. ०३ जानेवारी २०२२ पासून लागू होतील आणि वेळोवेळी त्यांचे पुनर्विलोकन केंद्र व राज्य शासनामार्फत केले जाणार आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वय वर्षे १५ ते १८ वयोगटामधील लसीकरण पात्र लाभार्थी संख्या अंदाजित १,१६,७०० एवढी आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड मनपाच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने वय वर्षे १५ ते १८ वयोगटामधील मुलांच्या कोविड १९ लसीकरणाची कार्यवाही सुरु आहे.
















