न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ३० जाने.) :- भोसरी एमआयडीसीतील बहुतांशी कारखान्यांमध्ये पाण्यावर आधारित उत्पादन प्रक्रिया आहे. कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पाण्याची नितांत आवश्यकता या परिसराला होती. फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे भोसरी एमआयडीसीतील औद्योगिक परिसरात पाण्याची पाईपलाईन बदलण्यास सुरुवात झाली आहे.
या परिसरातील पाण्याच्या पाईपलाईन गेल्या चाळीस वर्षांमध्ये बदलण्यात आलेल्या नव्हत्या. त्या पाईपलाईनमध्ये झाडाच्या मुळ्या जाऊन, काही ठिकाणी पाण्याच्या गळतीस सुरुवात झाली होती. त्यामुळे औद्योगिक परिसरात पुरेसा पाणीपुरवठा होत नव्हता. उद्योजकांना बऱ्याच वेळा टँकर मागवावे लागत होते. त्यासाठी फोरमच्या माध्यमातून वेळोवेळी पत्रव्यवहार करून, अधिकाऱ्यांशी बोलून, महापालिका व एमआयडीसी अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधून, यातून मार्ग काढण्यात आला.
या पाठपुराव्याची दखल घेऊन प्रशासनाने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे उद्योजकांनी दिलासा व्यक्त केला असून, या कामामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे भोर यांनी सांगितले आहे.











