न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२२) :- मध्य प्रदेशातील अट्टल दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंगावर गाड्या घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास मावळातील उर्से टोलनाक्यावर घडली आहे.
यात एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. मध्य प्रदेशातील अट्टल दरोडेखोर दोन मोटारीतून पुणे-मुंबई महामार्गावरुन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी उर्से टोल नाक्यावर सापळा रचला. संशयित वाहन टोल नाक्यावर पुढे सरकत होते. त्यावेळी सापळा रचलेल्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
पोलीस पकडण्यासाठी आल्याचे पाहून आरोपींनी पोलिसांच्या अंगावर गाड्या घालण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी जीवाची पर्वा न करता दोन गाड्यांमधील सहा आरोपींना ताब्यात घेतले. तर आरोपींचे इतर साथिदार डोंगरामध्ये पळून गेले. आरोपींचा शोध सुरु केला.












