न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर थुंकणे, कचरा जाळणे, घातक कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यक्ती अथवा अस्थापनांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. भोसरी येथील गव्हाणेवस्तीत उघड्यावर कचरा जाळणाऱ्या व्यक्तीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहरात उघड्यावर कचरा जाळणाऱ्या व्यक्तींवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. शहराला स्वच्छतेच्या स्पर्धेत देशातील दहा शहरात आणण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
तसेच शहरातील नागरिकांचा स्वच्छतेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. तरीदेखील शहरातील काही भागांमध्ये नागरिक रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे तसेच कचरा रस्त्यात जाळणे आदी गोष्टी वारंवार करत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वतीने भोसरी येथील गव्हाणेवस्ती येथे कचरा जाळणाऱ्या व्यक्तीवर ‘ ई ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
















