न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२२) :- राज्य सरकारने गुंठेवारी बांधकामांचे कायद्यानुसार नियमितीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत शुल्क निश्चिती देखील करण्यात आली आहे. त्यानुसार आता पीएमआरडीएकडून लवकरच गुंठेवारीनुसार आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी शुक्रवारी दिली.
राज्य सरकाच्या आदेशानुसार पिंपरी – चिंचवड शहरात नियमितीकरणाची कार्यवाही महापालिका पातळीवर सुरू झाली असताना पीएमआरडीएमार्फत याबाबत नियोजन अद्याप ठरले नव्हते. दरम्यान, आता पीएमआरडीए कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध गावांतील अनधिकृत घरांचे गुंठेवारीनुसार नियमितीकरण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी पुढील आठवडाभरात धोरण ठरविण्यात येईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
पीएमआरडीए महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले की, प्रारूप विकास आराखडा अंतिम करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. या आराखड्याचा गुंठेवारीनुसार नियमित होणाऱ्या बांधकामांबाबत काय परिणाम होऊ शकतो, याचा सध्या अभ्यास केला जात आहे. पीएमआरडीए क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे गुंठेवारी करण्यात कायद्यानुसार नियमित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.















